WELCOME

onlyactiveteachers.blogspot.in राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या वेबसाइटवर आपले सहर्ष स्वागत
animated-welcome-image-0114

समुहाबाबत लेख

*सुजाण पालकत्व कसे असावे*

                  काही दिवसांपूर्वी ब्लू व्हेल गेम बद्दल एकले. निरागस आणि निष्पाप अगदी 14 ते 16 वयोगटातील मुले याला बळी पडली. संपूर्ण जगात 200 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली. याला जबाबदार कोण ....?  तर काही अंशी पालकच मुलांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. आपले मूल इंटरनेट चा कसा आणि किती वेळ वापर करते याकडे पालकांनी लक्ष ठेवायलाच हवे.
            आई बाबा होणं एक वेळ सोपं आहे ,पण सुजाण पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे.पालकांनी त्याला त्याच्या गुण दोषासहित स्वीकारणे गरजेचे आहे . फक्त मुलाला जन्म देऊन आणि संगोपन करून तुम्ही सुजाण पालक बनू शकत नाही त्यासोबत योग्य संस्कार आणि तरुण वयातील आपल्या मुलांचे मित्र बनणे हे ही तितकेच महत्वाचे आहे .
               काही पालक आपल्या मुलांचे सगळेच हट्ट पुरवतात.मग त्यासाठी कितीही पैसा लागो.कारण अशा पालकांकडे मुलांसाठी वेळ नसतो. स्वतःच्या कामात ते इतके गुरफटलेले असतात की आपले मुल चुकीच्या मार्गाला लागले हे ही त्यांना उमजत नाही , कळत नाही.  अशा कोवळ्या वयातील मुलांना पालकांचे पैसे नको तर त्यांचा बहुमूल्य वेळ हवा असतो. कोवळे वय , त्यांना चांगले वाईट याची जाण नसते. आशा वेळी पालकांनी त्यांचे मित्र बनून त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगणे गरजेचे असते.
                रोजच्या धावपळीच्या युगात अनेकदा मुलांसाठी वेळ काढणं पालकांना शक्य नसतं. वडिलांना ऑफिस टूर्स, मीटिंगस् यामधून फुरसत मिळत नाही. आई ही नोकरी करणारी असेल तर नोकरी आणि घरकाम , बाहेरची काम यातून वेळ काढणं अवघड होतं. मुलांच्या शाळा ,अभ्यास, ट्युशन,एखाद्या खेळच वा कलेचं शिक्षण यामधूनही त्यांना मोकळीक नसते. आज  सगळीकडे शहरात आणि खेड्यातही आपल्याला अशीच जीवनशैली पाहायला मिळते . परंतु अधूनमधून प्रयत्नपूर्वक वेळ काढून पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिलाच पाहिजे. आयुष्यातला हा महत्वाचा भाग आहे.
                तुला हे जमणारच नाही ....कठीण आहे .....सोडून दे...... आशा नकारात्मक वाक्यांनी मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. याउलट तुला जमेल ..... आपण प्रयत्न करूया ...मी तुला मदत करतो ...अशी वाक्ये मुलांचा आत्मविश्वास वाढायला मदत करतात . आत्मविश्वास असलेले मुल कितीही कठीण काम किंवा परीक्षा सहज पार करू शकते. पण त्यासोबत पालकांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या क्षमता , इच्छा जाणून न घेता आपल्याच इच्छा त्यांच्यावर लादल्या तर मात्र मुलांचा यशाचा मार्ग दूरच राहतो. प्रत्येक मुल सारख्या क्षमतेचे नसते. इतर मुलांसोबत आपल्या मुलाची तुलना कधीच करू नये.
            प्रत्येक मुलात त्याच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळ्या क्षमता असतात. सुजाण पालकाने त्या क्षमता ओळखून त्याला योग्य ते खत पाणी घालून छोट्याश्या रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर करावे. सकारात्मक दृष्टिकोन हाच सुखी जीवनाचा आधार आहे.
        अवास्तव लाड करण्यापेक्षा समजून घेऊन त्यांना वेळ देणं महत्वाचं. मूल सुजाण नागरिक होण्यासाठी आपल्या मुलातील क्षमता ओळखण्याच सुजणत्व पालकांमध्ये असायलाच हवं. हे मात्र नक्की. 

                   - निलिमा व्यवहारे-चिंचकर
                      अहमदनगर     









*बालदिन विशेष*

*अबोल कळी फुलली*.......


कोमल बाळू मोरे .हिचे आई वडील मुळचे एवल्यातील ममदापुरचे. पण नोकरी करण्याच्या उद्देशाने ते धामण गावला स्थायिक झाले. कोमलचा जन्मही धामणगावलाच झाला. कोमल.... सावळ्या रंगाची मोठे डोळे असणारी थोड़िशी बुटकिच.माझ्याकडे जेव्हा दुसरीचा वर्ग आला तेव्हा  कोमल व माझी ओळख झाली.नेहमीच शांत असणारी ,मत्रिणींशीही कधी जास्त गप्पा न मारणारी ,मलाही पहिल्या नंबरला बसायचे आहे, असा हट्ट न करणारी ,अधुन मधून शाळेत येणारी, वाचन लेखनाचा अजिबातच गंध नसणारी ,मॅडम खेळायला सोडा न असा हट्टहि न करणारी, दप्ततरात फ़क्त पुस्तके व एक वही पण पेन्सिल नसणारी, सतत शेवटी जावून बसणारी असे काहीसे कोमलचे स्वरुप होते .

           माझ्याकडे जेव्हा दुसरीचा वर्ग आला तेव्हा मला सर्वच विद्यार्थी प्रगत करायचे असल्याने कालांतराने माझी ओळख कोमलशी झाली. पण कोमल दररोज शाळेत येत नव्हती .बऱ्याच वेळा ती दुपारी बारा ते एक च्या दरम्यान शाळेत येत असे.
       कोमल रोज शाळेत का येत नाही ?या करणांचा मी शोध घेण्यास सुरवात केली. कोमल शाळेच्या समोरच पण थोड़ी आतल्या गल्लित राहत होती. वर्गातल्या काही मुलींनी मला तिच्या घरी नेले. तिच्या घराच्या आजुबाजूचे वातावरण ही काही खास नव्हते. अगदी छोट्याशा कोपितच तिचे घर होते. पण तिच्या घराला कुलुप आढळल्याने नैराश्येने पुन्हा मी शाळेत आले.
     त्यानंतर दोन तीन दिवसांनी सतत निरोप पाठवल्याने ती पुन्हा शाळेत आली. आल्यानंतर "तू शाळेत का येत नाहीस "?असा प्रश्न केल्यावर अगदी तुटपुंज्या शब्दातच तीने उत्तर दिले. पण त्या उत्तराने माझे समाधान न झाल्याने मी तिच्या आईला शाळेत बोलावून घेतले .त्यानंतर तिच्या आईने दिलेल्या उत्तराने मी थोड्या कालावधिसाठी सुन्न झाले.तिच्या आईने सांगितले   "मॅडम आम्ही खूप गरीब हाय आम्ही मजुरी कराया जातो मला रोज 200 रु मिळतात मी सोबत कोमललाही घेऊन गेले तर ५o /१00रु आणखी वाढून मिळतात ". कोमलसारखी साडे सात वर्षाची चिमुरडी राणात मळयात जाऊन कापूस वेचणे, कांदे लावणे ,टोमॅटो तोड़णे, अशी काहीशी कामे करते, हे मला शाळेतल्या काही मुलींकडून समाजले .हे ऐकून मला फारच वाइट वाटले कारण हे सर्व माझ्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे होते,
        कोमलने शिकाव मोठ्ठ व्हाव .काहीतरी नोकरी करावी असे मला मनापासून वाटायचे. यासाठी मी सतत तिच्या आई वडिलांची भेट घेऊन कोमलला शाळेत पाठवा, ती अभ्यासात हुशार आहे असे सांगून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शासनाच्या विविध सवलतीनची माहिती दिली .५0 -१00रूपयांसाठी तिचे नुकसान करु नका तिला शाळेत पाठवा असे मी त्यांना वरवर सांगत असे .कारण जसे तिच्या आई वडिलांचे आयुष्य जातेय तसेच भविष्यात तिचे जावू नये असे मला मनापासून वाटायचे.सतत होणाऱ्या गृहभेटींमुळे कोमल आता शाळेत यायला लागली होती. तिला वाचन लेखन शिकवणारच .असे मी मनाशी पक्के ठरवले होते .वर्गातली जवळ जवळ सर्वच मुले वाचायला लागली होती पण कोमल व एकदोघेजन अजूनही अप्रगत होते .खरे तर या तिघांसाठी पुन्हा मुळाक्षरे व बाराखडी शिकवने म्हणजे माझ्यासाठी मोठे कसरतीचे काम होते. पण या गरीब मुलांसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करुण पाहू याच आशेने पुन्हा लेखन वाचन शिकवायला सुरवात केली. रोज दुपारच्या सुट्टी नंतर मी कोमलचे वैयक्तिक वाचन लेखन व १ते१00 अंक घेन्यास सुरवात केली .सततचा सराव प्रयत्न व तिची साथ यामुळे दुसरीला असतानाच कोमल अवघ्या ५/६ महिन्यातच वाचायला लागली. पण तिला वाचन लेखन सरावाची आणखी आवश्यकता आहे हे मला कळुन चुकले होते .त्यामुळे तिसरीला आल्यानंतरहि मी तिच्या लेखन वाचनात खंड पडू दिला नाही. त्यामुळे तिची अभ्यासातली प्रगती चांगली होती .माझी एक सवय म्हणजे त्या पाठातील दहा शब्दांचे श्रुतलेखन घेत असे. तिसरीला वर्षभर तिला कधी४ तर कधी ५ असे गुण मिळत असे .पण तिच्या अभ्यासात प्रगती निश्चितच प्रगती होती . हातच्याची बेरीज ,वाजबाकी, गुणाकार ,भागाकार ती तिसरित असतानाच अचूक करू लागली होती.
           यावर्षी कोमल आता चौथीच्या वर्गात आली आहे ,कोमलमधे होणारा प्रत्येक बदल हा मला आश्चर्यकारक असून मला सुखद अनुभव देत होता . तिच्यामधे बदललेली प्रत्येक गोष्ट मला विचार करायला लावत होती. कोमलचे हस्ताक्षर छान झालेले होते .गणिती क्रियाही ती जलद करत होती. इंग्रजी वाचनातही चांगली प्रगती दिसून येत आहे. झालेल्या परिक्षांमधे तीने अ श्रेणित मार्क मिळवले आहे .आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी मी वर्गात तीन अंकि संख्येला दोन अंकि संख्येने गुनने हा घटक शिकवला. उदा: ४५२*६२ अशा पद्धतिचा शून्याच्या संकल्पनेचा गुणाकार वर्गात सोडवायला दिला असता ,फ़क्त कोमललांच हा गुणाकार करता येत होता.  ही गोष्ट मला थक्क करुण सोडणारी होती. कोमलची प्रगती खरच वाख़ानन्याजोगि आहे. आता वर्गात एक नंबर हुशार कोमलच येईल की काय ?असे मला वाटायला लागले आहे .
           कदाचित दुसरीला असताना जर मी तिच्याकडे दुर्लक्ष केले असते, तर ती माझ्या आयुष्यातली फार मोठी चूक असती असे मला वाटते.  पण....आता कोमल पुन्हा शाळेत उशिरा यायला लागल्याने ती पुन्हा मजूरी करण्यास जाते की काय? अशी शंका मला येते परंतु पुन्हा तिच्या आईची भेट घेतल्यानंतर "आता आम्हाला कोमलला शिकवायच हाय ."असे तिच्या आईच्या तोंडून उदगार् ऐकल्यानंतर मनाला खरच समाधान वाटले. कारण कोमल ही त्यांच्या घरण्यातली पहिली मुलगी होती की जिला स्वाक्षरी करता येत होती.  आता कोमल सकाळी ८ते १२ मजूरी करायला जाते. पण बारा नंतर का होईना शिक्षणाच्या ओढिने रोज शाळेत येते. खरे पाहता... बालमजूरिस माझा ही विरोध. पण... वास्तविकता कोणाला टाळता येणार नाही.....

✍ श्रीम सीमा भाऊसाहेब गायकवाड.

जि.प.शाळा धामणगांव. ता. येवला; जि नाशिक








*शिक्षकांपुढील आव्हाने*

गुरुब्र्म्हा गुरुर्विष्णु,गुरूर्देवो महेश्वरा
गुरूर्साक्षात परब्रम्ह ,तस्मैश्री गुरुवे नमः

संस्कृत मधील हे सुभाषित अनादि कालापासून शिक्षकाची महती विषद करत आहे.प्राचीन काळी शिक्षण गुरुग्रही आत्मसात होत असे.गुरुकुल परंपरा असणारी आपली शिक्षणपध्दती होती.आता शिक्षणाची ही ज्योत 'शाळांतून' तेवली जात आहे.शाळा हे शिक्षण देणारे ,संस्कार रुजवून नवीन पिढी घडवून चांगले नागरिक निर्माण करणारे प्रभावी केंद्र आहे.शाळेतील हे कार्य पूर्णत्वास नेण्याचं काम शिक्षक करत आहेत.
             'शिक्षण केवळ डोक्यात माहिती भरणे नव्हे तर मानवातील सुप्तावस्थेत असलेल्या दैवी पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण होय' हा विचार स्वामी विवेकानंदांनी मांडला.खरंतरं एक शिक्षक म्हणून ह्या सुप्त गुणांची ओळख होणं,त्या गुणांना चालना देऊन उदात्त असे निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे.नवनिर्माणाची प्रक्रिया सोपी नसते.उपलब्ध साधनांचा वापर करून शिक्षक ही कामे आजवर पूर्ण करत आला आहेत.अभ्यासक्रमात उद्धृत केलेली ध्येये जीवनाभिमुख असतात.विद्यार्थ्यांचा शारीरिक ,सामाजिक ,बौध्दिक ,नैतिक असा सर्वांगीण विकास करण्याची अपेक्षा अभ्यासक्रमातून व्यक्त केली गेली आहे.अर्थात हे कार्य शिक्षकाकडून पूर्ण होणं अपेक्षित असते.
           शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे.सामाजिक परिवर्तनाचा खरा आधारस्तंभ शिक्षक आहे.२१ व्या शतकात झपाट्याने बदलणार्या परिस्थितीत शिक्षकाच्या भूमिकाही बदलत आहेत.खडू अन् फळा यासोबत फक्त  अभ्यासक्रम पूर्ण करणे हे शिक्षकाचे काम आता नक्कीच राहिलेले नाही.विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडविण्याची,आचारविचारांना वळण द्यायची ,जीवनमूल्ये रुजवायची जबाबदारी आज शिक्षकांना पार पाडायची आहे.
                आज शिक्षणाचा प्रवास गुरूकुल ते ई गुरूकुल पोहचला आहे.खडू फळ्याची जागा इंटरअॕक्टिव्ह फळ्यांनी घेतली आहे.पारंपरिक अध्यापन साधनांऐवजी संगणक ,टॕब्ज ही नवी साधने प्रचलित झाली आहेत.ह्या सगळ्या संक्रमणांतून जातांना स्वतःला ह्या बाबींपासून दूर ठेवणं शिक्षकांसाठी अवसानघातकी ठरु शकते.काळाची पावलं ओळखून शिक्षक स्वतः अपडेट राहणे हे अत्यंत मोठे अन् महत्त्वाचे आव्हान शिक्षकांपुढे आहे.डिजीटल इंडियात तंञस्नेही नसणं हे निरक्षरतेइतकंच लाजिरवाणं आहे एवढे माञ नक्की.स्मार्टफोन लीलया हाताळणार्या पिढीला इंटरनेटने ज्ञानाचा भांडार खुले करून दिले असले तरी शिक्षकाचे महत्त्व अनन्यसाधारणच आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत हजारो शाळा डिजीटल झाल्या.वाड्यावस्तीवरील मुले प्रोजेक्टरवर अन् संगणकावर शिकत आहेत.कोट्यावधींचा लोकसहभाग मिळवून महाराष्ट्रातील मराठीत शाळांनी कात टाकली ते शिक्षकांनी पेललेल्या आव्हानांमुळेच.शेकडो शिक्षकांनी तयार केलेले ई साहित्य आज दिशादर्शक ठरले आहे.तंञज्ञानाचा अध्यापनातील प्रभावी वापर हे आव्हान शिक्षकांना आज खुणावत आहे.
                  पारंपरिक वर्तनवादी पद्धतीला छेद देणारी रचनावादी पद्धत नव्यानं शिक्षकांपुढे आली.भिंती फरशा रंगल्या अन् शाळांचं रुपडं बदललं.अनुभव विश्व समृद्ध करणाऱ्या रचनावादाचा अंगिकार करत शिक्षकांनी मुले घडवलीत.अर्थात केवळ रचनावादच नव्हे तर नवनव्या अध्यापन पद्धतींचा शोध घेऊन विद्यार्थी गुणवत्तेसाठी नवनवीन प्रयोग करुन स्वतःला सिद्ध करणे हे प्रमुख आव्हान शिक्षकांपुढे नक्कीच आहे.कोणत्याही पद्धतीचं अंधानुकरण करण्यापेक्षा अनेकविध पद्धतीतून चिकित्सक विश्लेषण करुन स्वतःची स्वतंत्र पद्धत विकसित करणे क्रमपाञ आहे.विद्यार्थ्यांच्या वाढत्या जिज्ञासेला शमवू शकणारं ज्ञान शिक्षकास आत्मसात असणं काळाची गरज आहे.तंञज्ञानाच्या युगात व्यासंग वाढविणार्या पुस्तकांमधून शिक्षक तुटलाय ही माञ खेदाची बाब आहे.
                 बदलती प्रशासकीय धोरणे व शासनाच्या व समाजाच्या वाढत्या अपेक्षांचं शिवधनुष्य पेलणे हे खूप मोठे आव्हान शिक्षकांपुढे आ वासून उभे आहे.सरल सारखी आॕनलाईन प्रणालीचं शिक्षकांनी स्वागत केले माञ आॕनलाइन व आॕफलाइन माहितीने शिक्षकाचृ मनोधैर्य खचले.विविध शिष्यवृत्त्या,साजरे करावयाचे दिन व उपक्रम,विविध नोंदवह्या,अहवाल यासोबतच समाज माध्यमांवर राञी अपराञी येणारे संदेश व धमकीवजा परिपञके,शालेय पोषण आहार,निवडणूक आयोगाची कामे,महसूल व आरोग्य ची कामे यांमुळे कुठेतरी शिक्षक हा विद्यार्थ्यांनापासून तुटत चाललाय.एकीकडे गुणवत्तेची अपेक्षा अन् दुसरीकडे शिक्षकांच्या मानसिकतेशी क्रुर खेळ ह्या कैचीत शिक्षक अडकलाय.नुकताच कमी पटाअभावी १३००+ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला.एक शिक्षक म्हणून ह्या सगळ्या चक्रात शाळा टिकविणं,विद्यार्थी घडवणं अन् गुणवत्ता वाढविणे हे तिहेरी कार्य शिक्षकापुढे सगळ्यात मोठे आव्हान आहे.विविध प्रक्रियांत शिक्षक विभागला गेल्याने संघटित होऊन विद्यार्थी हितासाठी एक होण्याची अग्निपरिक्षा शिक्षकांना द्यावी लागणार आहे.
             शिक्षकाचा व्यवसाय हा इतर व्यवसायांपेक्षा अधिक संवेदनशील आहे . यापुढील काळात त्याच्या व्यावसायिक भूमिकेत बदल होण्याची शक्यता आहे  .सर्वांना एक होऊन झगडावे लागेल, रस्त्यावर यावे लागेल तरीही शिक्षकाने विद्यार्थ्यांचे व्यक्तित्व घडविण्याची जाणीव ठेवावी व नवी पिढी आपल्याला निर्माण करायची आहे त्याचे सुस्पष्ट चित्र डोळ्यासमोर ठेवून त्यांना परीक्षार्थी न करता जीवनासाठी एक सुजाण नागरिक घडविण्याचे आव्हान स्विकारावे .

वैशाली भामरे - नाशिक





1



)   मी सावित्रीची लेक...

शिक्षणासाठी धडपड..

अाज सावित्रीच्या लेकी उपक्रमातर्गंत मला लिहावेसे वाटते. हा मोठेपणा नाही किंवा केलेले उपकार नाहीत.
अापण इतरांना छोटी -मोठी मदत करतच असतो 
पण ती मदत एखाद्याचे अायुष्यच बदलून टाकणारी असेल तर नक्कीच स्वत:ला झोकून द्यावं.. मदतीचा हात पुढे करावा..
ही घटना साधारण चौदा-पंधरा वर्षापुर्वीची असेल,
अाम्ही उभयता ज्या शाळेत शिकवत होतो त्या शाळेच्या समोरील घरात सुगंधा तिचे अाई-बाबा राहत होते. बेताची परिस्थीती असणारे कुटुंब. सुगंधाचा दादा रोजी रोटी साठी मुंबईत राहत होता. सुगंधा इयत्ता दहावीत शिकत होती.
एके दिवशी अचानक तिच्या बाबांना रक्ताच्या उलट्या झाल्या व त्यांचे डाॅक्टर उपचार करण्या अाधी निधन झाले. संपूर्ण कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले...
सुगंधाची दहावीची परिक्षा तोंडावर अाली होती 
घरात माणसांची ये-जा होती. तिचा अभ्यास होत नव्हता..
दुपारी ती रोज शाळेत येत असे. अामच्या बोलण्यातून तिला धीर मिळत असे. ती सर्व गोष्टी share करत असे. अभ्यास कसा करायचा यावर चर्चा व्हायची. तिची परिक्षा झाली. तिला दहावीला ७५%गुण मिळाले. कोणताही क्लास नाही की मार्गदर्शन नाही तिचा अभ्यास तिनेच केला. अाम्ही फक्त तिच्या पाठी उभे राहिलो. त्यानंतर तिला अाम्ही सायन्स ला प्रवेश घेणार होतो. पण ती अचानक मुंबईला गेली. मला वाटले येईल ती! हवा बदल म्हणून गेली असावी...काही दिवसाने तिचा फोनअाला त्यावेळेस मोबाईलचा fever अाजच्या इतका नव्हता. पण तिने कुठून तरी फोन केला की बाई मला दादाने इथे धुणी भांडी करण्यासाठी अाणले अाहे. मला इथे राहयचे नाही, तुम्ही दादाला सांगा. तो कोणाचेच ऐकत नाही. चुलते किंवा मामा कोणाचेच नाही.. तुमचे ऐकेल तो! मला अापल्या गावीच यायचं अाहे. मी काम पण करेन अाणि शिकेन पण अाणि ती रडायला लागली.. असे वाटले की ती दुनियाच्या कुठल्या कोपर्‍यात गेलेय?कुठल्या कोपर्‍यातून बोलयतेय.. तिचा अावाज खुप बारीक होता..कोणा परक्याच्या घरी काम करतेय ती ?कुठे अडकलेय?असे अनेक प्रश्न मला सतावू लागले. तिच्या बोलण्यातून असुरक्षितेची भावना जाणवली. शिवाय घरच्या माणसांच्या विरोधात जावून तिने हा निर्णय घेतला होता. माझा तिला support हवा होता. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. ती जिद्दी मुलगी होती.. अाम्ही तिला गावी अाणण्यासाठी खुप प्रयत्न केले शिवाय पुढची जबाबदारी होतीच! 
अामच्या धावपळीला यश अालं. सुगंधा गावी अाली मला मिठी मारुन खुप रडली. माझ्या मिस्टरानीं तिला एका Auto showroom मध्ये ३०००/रु नोकरी मिळवून दिली. इथेच न थांबता १२वीला सतरा नं. फाॅर्म भरुन कला शाखेत प्रवेश घेतला. काम करून सायन्स करणे शक्य नव्हते. तिने काम वअभ्यास दोन्ही बाजू सांभाळल्या अाणि तिला१२वीला ६५%गुण मिळाले..अाम्ही तिला y.c.m.ला प्रवेश घेउन दिला. तिने Graduation पुर्ण केले.
अशा प्रकारे सावित्रीची लेक खडतर प्रवास करुन शिकली. अात्मविश्वास वाढला. पुढे ती मंदिरात होम हवन साठी ग्रंथाचे वाचन करु लागली. तिची भरारी पाहून मन सुखावले.
तिला चांगले स्थळ अाले. लग्न करण्यापुर्वी असंअसं स्धळ अाहे मी करु का? असे विचारायला अाली. खर तर हा निर्णय देणे सोपे नव्हते पण प्रत्यक्ष नवर्‍या मुलाला घेऊन शाळेत अाली व अाम्हा उभयतांची परवानगी घेऊनच गेली. अाता तिचे रुटीन छान जमले अाहे. चांगला शिकलेला नवरा मुलगा भेटला.. तिला एक मुलगा, स्वत:चे घर अाहे. खुप छान झाले तिचे! 
पण तिने ते काम सोडले नाही. अजूनही करते. पगारही चांगला अाहे..
कोणते ही नाते नसताना अापुलकीचे वागणे, तिचा अामच्या शब्दावर असलेला विश्वास.. शिकण्याची धडपड...
तिच्यातील चिकाटी, येणार्‍या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत,सगळ्यांचा विश्वास संपादन करणारी. गुणी अाणि मुळातच हुशार असणारी सुगंधा...... 
अाज ती तिच्या पायावर उभी अाहे यातच अाम्हाला समाधान अाहे. सुखी अाहे ती! सुगंधा खरी सावित्रीची लेक ठरली अाहे....

सौ. स्मिता पाबरेकर 
ता. माणगाव. जि. रायगड.
मो. नं. ९४२२३५८५२१







3) माहिती तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग


         खडू आणि फळ्याच्या मदतीने बंदिस्त वर्ग खोलीत विद्यार्थ्यांना माहिती देणे ही आपल्या काळातील शिक्षण पद्धती आता कालबाह्य झाली आहे. नवनवीन तंत्रज्ञानामुळे माहितीची वा ज्ञानाची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे. आज रोजी जगात जेवढा माहितीचा साठा असेल, त्याच्या दुप्पटीने साठा केवळ 4-5 वर्षांच्या कालावधीत नव्याने येत आहे.  ह्या प्रचंड माहितीच्या साठ्याला हाताळण्यासाठी तंत्रज्ञानाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. 
         विसाव्या शतकातील तंत्रज्ञानातील सर्वात मोठी भेट म्हणजे संगणक;  त्याला जोड मिळाली आंतरजाल अर्थात इंटरनेटची. दैनंदिन मानवी जीवनातील अविभाज्य घटक म्हणून यांनी जागा पटकाविली  आहे. तिथे शिक्षण क्षेत्र याला कसे अपवाद ठरणार? 
         मा. पंतप्रधान नरेंद्रजी  मोदी यांची 'डिजीटल इंडिया' ही संकल्पना,  माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम यांनी पाहिलेले 2020 मधील प्रगत भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षकांचे  मोलाचे योगदान असणार आहे. अध्ययन - अध्यापन पद्धतीत तंञज्ञानाचा वापर करून शिक्षण क्रांती हळूहळू आपली मुळे रूजवित आहे. 
         संगणक तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान व संप्रेषण तंत्रज्ञानाने कमीत कमी वेळात जास्तीतजास्त  माहिती मिळवता येते. एका क्लिक वर आपण हवी ती माहिती मिळवू शकतो, ज्याचा उपयोग शिक्षक व विद्यार्थी यांना विषयाचे सखोल ज्ञान, संदर्भ ग्रंथ, प्रकल्पाची माहिती, साहित्यिक सर्वेक्षण यासाठी होवू शकतो. कुठल्याही काळात जाऊन इतिहास, वर्तमान व भविष्य याचा अभ्यास केला जाऊ शकतो. इंटरनेट या माहितीच्या वैश्विक जाळ्यामुळेच संगणक क्षेत्राला 'माहिती तंत्रज्ञान क्षेत्र' हे नाव पडले.
           KG पासून PG पर्यंत शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रकारचे प्रोग्रॅम, शैक्षणिक खेळ, दूरदर्शन आणि रेडिओ यांवर प्रक्षेपित होणारे शैक्षणिक कार्यक्रम ह्याचा उपयोग अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत करून ह्या प्रक्रीयेला अधिक सुलभ केले जावू शकते. यामुळे स्वयंअध्ययन प्रक्रीयेला चालना मिळते आणि स्वगतीने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागते. 
        गणित व विज्ञान सारख्या विषयांत रूची निर्माण करण्यासाठी तंञज्ञानाची मदत घेतली जावू शकते. किचकट वाटणाऱ्या या विषयांसाठी त्याची वारंवार उजळणी आवश्यक असते.  जिओजेब्रा सारखे प्रोग्राम वापरून गणितीय घटक शिकणे वा शिकवणे अधिक प्रभावी होण्यास मदत होते. ञिमितीय आकृत्यांची अनुभूती विद्यार्थी घेवू शकतात. मायक्रोफोन,  डिजीटल कॅमेरा, स्कॅनर,  प्रिंटर,  वेब कॅमेरा,  व्हिडिओ कॅमेरा,  संगणक नियंत्रित मायक्रोस्कोप, एल सी डी प्रोजेक्टर अशा विविध साधनांचा वापर करून सादरीकरण प्रभावी करता येते. विज्ञानामध्ये व्हीडीओ कॉनन्फरन्सींग,  यू ट्यूब व्हिडीओ, ऑनलाईन बुक्स च्या सहाय्याने कृती करत सहभागातून शिक्षण घेतल्या जावू शकते. ज्या प्रयोगांमध्ये विषारी वायू निर्मिती वा स्फोट होवू शकतो असेे जोखीम असलेले प्रयोग व्हर्चुअल लॅबमध्ये अॅनिमेशन द्वारा निर्देशित केले जावू शकतात.
           एवढेच नव्हे तर मूल्यमापनासाठी सुद्धा तंञज्ञानाचा वापर केला जावून पेपरलेस अर्थात ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातात, ज्यामुळे कमी मनुष्य बळात अचूकता व गती  वाढवली जाते. पालक संपर्कासाठी तंत्रज्ञान वापरले जावू शकते. संगीत, खेळ, कार्यानुभव, चित्रकला या विषयांमध्येही  माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाला खूप वाव आहे. 
         मान्य, की या सर्व गोष्टीसाठी या विविध डिजीटल साधनांची उपलब्धता असणं ही फार मोठी बाब आहे.  नसतील ही साधने उपलब्ध, नसेल आपली शाळा डिजीटल,  तरी एक तंञस्नेही शिक्षक स्वतःच्या खिशातील अॅनड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने हसतखेळत आनंददायी शिक्षण देवू शकतो. दृक-श्राव्य माध्यमांमुळे विद्यार्थी भान हरपून अध्ययन करतात. पाठ्यपुस्तकांमधून हव्या त्या चिञांचे फोटो घेवून, हवे तसे क्रॉप करून, किंवा इंटरनेट वरुन डाऊनलोड करून ब्लेंड कोलाजमध्ये टेक्स्ट, इमेजेस, आकर्षक बॅकग्राऊंडचा वापर करून स्लाइड्स तयार केल्या जावू शकतात. या स्लाइड्सच्या सहाय्याने पीपीटी  (पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन ) अथवा शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती केली जावू शकते. ज्याच्या तालावर अवघी शाळा बागडायला लागते. कठीण ते सर्व सोपे होत जाते. ब्ल्यू टूथ स्पीकर मोबाइलला कनेक्ट करुन आवाज वाढविला जावू शकतो. लॅपटॉपवर व्हिडिओ दाखवले तर वर्गातील सर्व विद्यार्थी ते पाहू शकतात. मग वर्गात बसूनच ते जगाची सफर करतील; महासागर, वाळवंट, अभयारण्य, विविध खडकांचे नमूने, ऐतिहासिक वास्तू,  ऐतिहासिक युद्धाची ठिकाणे या सर्व गोष्टींची अनुभूती घेवू शकतील.  एवढेच नव्हे तर यू ट्यूब वर स्वतः  चॅनेलची निर्मिती करून हे व्हिडीओ शेअर केल्या जावू शकतील. 
चला तर मग, 
       बनुनी तंञस्नेही, करू या ज्ञानार्पण
     घडवू या सूज्ञ पिढी, करू या राष्ट्राला अर्पण

  
-  सौ. आशा रवींद्र पाटील, 
    बुलढाणा 
9423565684







4)महिला दिन विशेष

ओळख स्त्रीशक्तीची.....

लेखिका : सुषमा सांगळे-वनवे

८ मार्च अर्थात जागतिक 'महिला दिन'स्त्रीमुक्तीपेक्षा स्त्रीशक्तीची महत्व जाणून हा दिवस जागतिक स्तरावर सर्वत्र साजरा केला जात आहे त्यातून काय साध्य करायचे आहे? केंव्हापासून हा दिन साजरा केला जात आहे ? हे जरासे समजून घेऊया ....
     सन १९७५ मध्ये ८ मार्च या दिनास जागतिक महिला दिन म्हणून मान्यता देण्यात आली .पुन्हा प्रश्न येतो तो म्हणजे मार्च महिनाच का निवडला ? तर या महिन्यात महिला विशेषत्वाचे अनेक दिवस आहेत .स्त्री शिक्षणाचे बीज भारतात रोवलेल्या सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन याच महिन्यात आहे तसेच वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ट रुढीत बदल घडवून आणणारा मुलींच्या विवाहासाठी संमती वयाचा कायदाही याच महिन्यात संमत झाला होता अशा अनेक महिला संबंधी टप्प्यांचा विकास याच माहिन्यात झाला आहे .
      स्त्रीशक्तीला विनम्र अभिवादन करून स्त्री जीवनाची संकल्पना समजावून घेणे उचित ठरते .परिपूर्ण स्त्रीचे जीवन कुटुंबाशी व समाजाशी निगडित असते .किंबहुना सद्यकाळात त्याहीपेक्षा स्वतः शी जास्त निगडित आहे .आजच्या स्त्रीने गरुडभरारी घेतली आहेच ती आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे .तिला आज कोणतेही क्षेत्र निषिद्ध असे नाही अर्थात जिथे अडचणी नाहीत असे देखील कोणतेही क्षेत्र नाही यावेळी प्रत्येय स्त्रीने स्वतः हे ओळखून वागायचे आहे कि, मी असंख्य चेहऱ्यापैकी एक चेहरा म्हणून जगणार आहे की ,कि माझी स्वतः ची ओळख प्रस्थापित करण्याची मला आवश्यकता आहे ?व त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे का?....ही प्रत्येक स्त्रीची वैयक्तिक निवड आहे.ज्याप्रमाणे भाकरी तव्यावर फिरविली नाही तर ती करपते ,सतत बांधलेला घोडा पाळण्यासाठी निकामी ठरतो .याच तत्वावर आपण पुढे चालायचे असते .जगात वाकणारा आणि वाकवणार या दोन जाती असतात .लवचिकपणा हा स्त्रीत्वाचा एक निर्विवाद गुण आहे पण तोच गुण कमजोरी ठरतो तेंव्हा अनेक वेळा इतरांकडून आणि तिच्या स्वतः कडून अवगुण मनाला जातो आजही सुसंस्कृत घरातून विवाहित अथवा अविवाहित स्त्रीवर हात उगारला जातो .तिच्या मानसिकतेवर आणि शरीरावर आघात होतात .तिला अन्याय्य वागणूक मिळते ,त्यावेळी प्रत्येकीला प्रतिकार करता आलाच पाहिजे .त्यासाठी अनेक कायदे झालेले आहेत .कायदेशीर यंत्रणा उभी आहे .कायद्याची यंत्रणा आणि इतर समाजसेवी संस्था मदतीला असतातच पण स्वतः मध्ये आत्मविश्वास नसेल तर बाहेरची मदत अपुरी ठरते.आत्मविश्वासाच्या अभावी आजही कांही स्त्रिया कुटुंबातून होणाऱ्या अन्यायाला वर्षांनुवर्षे बळी पडत आहेत. पण याच लवचिक छडीचा जेंव्हा फटका बसतो तेंव्हा तो जास्त लागतो .
     मला इथे एका गोष्टीची आठवण होते ती म्हणजे हत्तीला लहानपणापासूनच साखळीने बांधून ठेवण्यात येते.मोठा झाल्यावर साखळी गळून पडली तरी सवयीने तो खुंटीपाशी उभा राहतो .साखळीची त्याला इतकी सवय होते की, साखळी बांधलेली नाही हे त्याच्या लक्षातच येत नाही .साखळी ती केवढी! हत्तीची ताकद केवढी!!साखळी असताना तो साखळी तोडू शकत नाही .साखळी गळून पडली तरी साखळीच्या आभासात तो मोकळा होऊ शकत नाही.साखळीचे बंधन प्रत्यक्षात त्याच्या मनावरचे आणि बुद्धिवरचे बंधन ठरते.बहुतेक वेळा नेमके हेच होते .हत्तीच्या या गोष्टीत जणू स्त्रीजन्माचे पूर्ण सार लपलेले आहे .
स्त्रीची क्षमता ताकद, मानसिक शक्ती खूप मोठी असते.तिचे सामर्थ्य वेगळ्या प्रकारचे आहे.शारीरिक आणि मानसिक अतीव वेदना सहन करण्याची शक्ती स्त्रीला दिलेली आहे .वात्सल्य ,माया,सहनशीलता,प्रेम देण्याची व प्रेम करण्याची क्षमता,सौंदर्य,चिकाटीu,अनेक पातळीवर एकाच वेळी अनेक व्यवधाने समर्थपणे सांभाळण्याची,कुवत,सर्व नात्यांना जोडण्याची आवड,नाती सांभाळण्याची निवड ही स्त्रीत्वाची बलस्थाने आहेत.नव्याने जगाची निर्मिती करण्याची क्षमता निसर्गाने स्त्रीला दिलेली आहे.स्त्रीला संवेदनशील,जबाबदार,व्यक्ती म्हणून स्वतः चे एक अस्तित्व आहे.मात्र वर्षानुवर्षे कुटुंबाने आणि समाजाने लादलेल्या बंधनामुळे,सर्वसामान्य स्त्रीला स्वतः च्या सामर्थ्याची जाणीव नाही.तिच्या मनावरील साखळ्या तोडून स्त्रीशक्ती काय आहे हे तिने समजून घेणे गरजेचे आहे.
      आपल्या आयुष्याला आपण जबाबदार असतो .हे जाणून घेऊन परिस्थितीवर मात करता आली पाहिजे.
       आजही आपल्या समाजात स्त्रियांमधील श्रेष्ठ गुणांना  सर्वसाधारणपणे त्यांचा कमकुवतपणा समजला जातो.कारण हे गृहीतच धरलेले असते स्त्रियांची बुद्धिमत्ता हा बऱ्याचवेळा समाजातील  कुचेष्टेचा विषय असू शकतो.तो हेव्याचा मत्सराचाही विषय होतो.स्त्रीत्वाच्या जोडीला बुद्धिमत्तेची साथ लाभली तर तीच स्त्री सर्वस्व ओतून स्वतः ला झोकून देऊन तिच्या कार्यक्षेत्रात समर्थ योगदान देवू शकते.हे कार्यक्षेत्र घराच्या उंबरठ्याच्या आत असू शकते.अथवा बाहेरच्या जगातही असू शकते.त्यामुळे पुन्हा म्हणावेसे वाटते ते म्हणजे स्त्री शक्ती आहे.तिला मुक्तीची जोड द्या. अशा या स्त्रीशक्तीसाठी पुढील ओळी.....
  " ममता प्रीतीचा फुलवीत मळा
  शृंगार तिने आगळा केला....
  कधी चंद्रि तर कधी मैदानी....
  खेळ जीवाशी तिनेच खेळला..
  छेडेल कुणी या बीजलीला ....
  भस्म होईल त्याची काया....
  रवी प्रभाते ये उदयाला ....
  नमो नमः भारतीय नारीला..,,,!"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लेखिका - सुषमा सांगळे-वनवे
शाळा जामसंडे कट्टा, ता.देवगड जि. सिंधुदुर्ग

मो.नं.9420312651






5)मूल्यशिक्षण -काळाची गरज

     जग एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे .हे 'ज्ञानयुग'सुरू झालंय.मानवाने जमिन ,पाणी व वायू तिन्हीही क्षेत्र तंत्रज्ञानाच्या अविष्काराने पादाक्रांत केली आहेत.परंतु  कमावलेल्या शक्तीसामर्थ्याबरोबर व्यक्ती ,मानवता जपणा-या मूल्यानुसार आपले वर्तन करतोय का? कवी म्हणतो...
     उंच झेप घेण्या
    बळ पंखात येऊ दे!
     विशाल आकाश 
      कवेत माऊ दे!
    परंतु प्रगतीचे पाऊल टाकताना मानवी  मूल्ये जपली पाहिजेत.'माणसाने माणसाशी माणूसकीने वागले पाहिजे'.बालवयातच मूल्यसंस्कार होणे गरजेचे आहे.त्याला मिळालेल्या  संस्काराची शिदोरीवरच आदर्शवादी व्यक्ती घडतो.
       मूल्यशिक्षण हा शिक्षणाचा मूलाधार आहे.शिक्षणातून सुसंस्कृत मानव घडावा,समाजाचा नैतिक स्तर उंचावा यासाठी  प्राचीन  गुरूकुल पद्धतीपासून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापर्यत उत्तम चारित्र्यवान व्यक्ती घडण्यावरच भर दिला आहे .व्यक्तीचा सर्वागिण विकास हेच शिक्षणाचे ध्येय आहे .
     "माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला" ? ह्यासाठी श्रमप्रतिष्ठा,राष्ट्रभक्ती,स्त्री -पुरुष समानता,सर्वधर्मसहिष्णूता,
वक्तशीरपणा,सौजन्यशीलता,
नीटनेटकेपणा,वैज्ञानिक दृष्टिकोन व संवेदनाशीलता ह्या दहा मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांत विकसित होत आहे का?सोशल मिडीयाच्या प्रभावाने वाहत जाणारी तरुणाई,बदलते समाजचे रुप, विचार पाहता मूल्यशिक्षण-काळाची गरज बनलाय!
      झटपट श्रीमंतीच्या मोहापाई वाढता भ्रष्टाचार,अत्याचार करून  सुखसोयी मिळवता येते .परंतु स्व-कष्ठाने मिळालेली मीठ-भाकर समाधानी व मानाचे जीवनमान देते.शांत व आनंदाने झोप घेऊ शकतो.विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे गरजेचे बनलयं.
      परस्त्रीला मातेसमान मानणारी संस्कृती .'निर्भया'सारखी अनेक प्रकरणे काळीमा फासणारी आहेत .सौजन्यशीलता,संवेदनशीलतेचे धडे मूल्यशिक्षणातून मुलांना बालपणातच देणे गरजेचे आहे.सानेगुरुजींना मूल्य घरातून रुजवली.शिवाजींना थोरांचा आदरभाव व राष्ट्रप्रेमाचे बाळकडू घरातून मिळाले.
        घर,शाळा व समाज इ.तून व्यक्तीचे व्यक्तीमत्व घडते.समाज अंधश्रद्धेची पट्टी बांधून मांत्रिक ,बुवा-बाबा यांच्या सांगण्याने नरबळी ,गंडा-दोरे यावर विश्वासून फसतात.शाळा कॉलेजातून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी प्रयोग -प्रात्यक्षिकाद्वारे सत्य समोर मांडावे.प्रत्येकाला असे का घडले?यामागील कारण शोधण्याची सवय लागेल तरच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल.
      सा-या जगापुढे 'वाढता दहशदवाद' प्रश्न निर्माण झालाय.तरुणाई धर्म ,पैसा  व हुकमत यासाठी दहशदवादी कृत्यात सामील होते .राष्ट्रीय एकात्मता ,सर्वधर्मसमभाव मूल्याची जाणीव करण्याची गरज भासलेय .माणूसच माणसाला संपवतोय.सर्वांनी 'मानवता हाच धर्म 'मानावा.थोर व्यक्तीचरित्र वाचनात ठेवावे.
   विद्यार्थ्यांनी 'ध्येय निर्धारीत करा'!.साधं आणि पवित्र जीवन जगा.समाजातील आभासी भासणारे जग शाश्वत नाही .म्हणून मूल्याचे आचरण करून स्वतःच बना "जीवनाचे शिल्पकार ".


जन्माला तर सगळेच येतात
इतिहास मोजकेच घडवतात!
मूल्यांचा अवलंब जे करती
जगी थोर होई त्याची महती!!


सौ.श्रद्धा गणेश अंबुर्ले
शाळा -विंचवली
ता-माणगाव
जिल्हा -रायगड
मो.न.-९२७२३७८८६८







6)अप्रगत मूल प्रगत कसे करावे

सुरुवातीला मला सांगावेसे वाटते की,लेख लिहिण्यासाठी आपल्याकडे भरपूर विषय आहेत,पण माझा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माझे "विद्यार्थी".त्यांच्या संदर्भातील हा विषय मला खूप भावला म्हणून माझा हा लेख लिहिण्या मागचा सर्व खटाटोप .


          मला इथे नमूद करावेसे वाटते की,मी एक शिक्षिका आहे आणि शिक्षकाची जवळीकता असते ती म्हणजे "विद्यार्थ्यांशी".

ज्या शिक्षकाला विद्यार्थी जवळचा असतो तोच शिक्षक विद्यार्थ्यांच्याही आवडीचा असतो हेही तितकेच खरे.मला माझा पेशा आणि माझे विद्यार्थी यांचा सार्थ अभिमान वाटतो म्हणून मी हा विषय लेखासाठी निवडला,असो...
             आपल्या वर्गामध्ये अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी आलेली असतात.प्रत्येकाचा अध्ययन स्तर हा वेगवेगळा असतो,प्रत्येकाची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते.त्यामुळे अर्थातच प्रत्येकाच्या समस्याही वेगवेगळ्याच असतात..जसे-1)कोणाला संकल्पना लवकर समजते तर एखाद्याला उशिरा,,
2)एखाद्याचे वर्गात लक्षच लागत नाही,,,इत्यादी.

          आपण जरी सर्व विद्यार्थ्यांना वर्गात अध्यापन करत असलोत तरीही प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्यापनातील गती ही सारखी नसतेच.त्याची कारणेही वेगवेगळी असतात.

मी सुद्धा विचार केला की ,मी प्रत्येकाला तेवढेच ज्ञान देण्याचा प्रयत्न सतत करत असते मग काही मुले अभ्यासात मागे का?ती अप्रगत का आहेत??विचारा अंती काही कारणे मला सापडली ती खालील प्रमाणे--------------
१)कुटुंबापासून दूर राहिल्याने ती मोकळी राहत नाहीत परिणामी अध्ययन गती कमी होते.
२)काही मुलींना  घरी गेले की लहान भावंडे सांभाळावी लागतात.त्यामुळे अभ्यास मागे राहतो.
३)अभ्यासात मागे राहिल्याने मित्रांमध्ये मिसळण्यास कमीपणा वाटतो,परिणामी अभ्यासातील गोडी कमी होते..................
            ही आणि अशी बरीच कारणे मूल अप्रगत राहण्यास कारणीभूत आहेत...............
पण काही मुलं अप्रगत ठेवून आपण पुढे जाणे तितकेसे मनाला न पटण्यासारखे आहे..
मग ठरवले,काहीही करायचे आणि जी मुले अप्रगत आहेत ती प्रगत करायचीच..म्हणतात ना,,
              "ध्येयाच्या नौकेत बसून प्रयत्नांची वल्ली मारली असता यशाचा किनारा दूर राहत नाही"या उक्तीप्रमाणे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत"ज्ञानरचनावाद "यावर आधारित शैक्षणिक साहित्य तयार केले.ज्यामुळे अप्रगत मुलं प्रगत होण्यास मदत झाली आणि काय चमत्कार!!!!!!!!पाहता पाहता सर्वच मुले प्रगत झाली .ती कशी काय? हे सर्व कसे साध्य झाले त्याची कारणे मी तुम्हांला थोडक्यात सांगते------------
१)शैक्षणिक साहित्य वापरामुळे मुले आंनदी झाली परिणामी प्रसन्न चित्ताने गृहनक्षमता आपोआपच वाढली.
२)स्वयंअध्ययन करू लागली,त्यामुळे स्वतः समस्या निराकरण करण्यास समर्थ झाली.
३)कौटुंबिक मोकळे वातावरण निर्मिती झाली,स्वच्छदंपणे अध्ययनरत झाली.
४)मुलाच्या प्रत्येक गुणास चालना मिळू लागली.
५)त्यामुळे नवनवीन साहित्यातून शिकण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.
६)प्रत्येकाची गरज ओळखून मार्गदर्शन त्यांना मिळाल्यामुळे मुलातील न्यूनगंड नाहीसा झाला.
७)उपस्थिती वाढली,परिणामी गुणवत्ताही वाढली.
८)प्रत्येक मूल प्रगत करायचे असेल तर त्यांची गरज आपण ओळखली पाहिजे तरच ते मूल शाळेत टिकेल आणि तरच शिकेल.............
       असे सर्व प्रकारचे प्रयत्न आणि जिद्द जर आपण मनात ठेवली तर नक्कीच आपल्या पुढे बसलेलं प्रत्येक मूल प्रगत होण्यास उशीर लागणार नाही.१००%आपला वर्ग आणि आपली शाळा प्रगत होण्यास मदत होईल...............
          शेवटी जाता जाता मला असे म्हणावेसे वाटते की-------
   
"ज्ञानरचनावाद आपण राबूयात,
प्रत्येक मूल प्रगत करूयात,
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडूयात..........

मूलभूत वाचन प्रशिक्षणातून,

मजेशीर गीते,गोष्टी गाऊ यात,
 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूयात......   

अप्रगत मूल प्रगत करण्या,

सर्व पणाला ल काही क्लुप्त्या वापरून,आपापल्या कला वापरून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपला "दृष्टिकोन" जर सकारात्मक असेल तर अप्रगत मूल प्रगत करणे नक्कीच सोपे होते नव्हे ते साध्य आहे.


नाव- श्रीम उषा बप्पासाहेब ढेरे

जिल्हा- बीड

No comments:

Post a Comment

राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह